Friday, 20 March 2015

गुढीपाडवा हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो. हिंदू वर्षातील हा पहिला दिवस आहे.  पुराणात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त.

ब्रह्म्याने या दिवशी विश्व निर्मिले, असे मानले जाते.  चैत्र महिना मराठी महिन्यांतला पहिला महिना. त्या महिन्यांतला पहिला दिवस म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा नव संवत्सराचा म्हणजे नव वर्षाचा पहिला दिवस. ह्या दिवशी दारोदारी गुढी उभारून ह्या नवीन सुरू होणाऱ्या वर्षांचे स्वागत केले जाते. ह्या दिवशी गुढी उभारायची ही आपल्या भारतीय संस्कृतीतली जुनी परंपरा आहे.  प्रभू रमचंद्र हे चौदा वर्षांच्या वनवास संपवून अयोध्येला परत आले तो हा दिवस. त्या दिवशी सकल अयोध्या वासियांनी गुढ्या तोरणं उभारून श्रीरामांच स्वागत केल तो हा दिवस.

ह्या चैत्र महिन्यांत जर आपण सभोवतालच्या सृष्टीच अवलोकन केलं तर असं लक्षात येत की, शुष्क झालेली सृष्टी, पानांची मोठ्या प्रमाणावर झालेली पानगळ, निष्पर्ण झालेले वृक्ष हे आता चैत्राच्या नव पालवीनं फुललेले असतात. वसंत ऋतूची चाहूल ही कोकीळ कंठातून फुटणाऱ्या सु-स्वराने लागलेली असते. निसर्गातल्या परिवर्तनाचा, नव चैतन्याचं,नव सृष्टीचं स्वागत दारी गुढी लावून करायच हा पण त्या मागचा एक उद्देश आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदेला लवकर उठावे. मंगलस्नान करावे आणि सुर्योदयाच्या वेळ म्हणजेच ब्राह्म मुहुर्तावर ही गुढी उभारायची असते.

चैत्र प्रतिपदा ह दिवस साडेतीन मुहुर्तातला एक म्हणून ह्या दिवसाला महत्त्व आहे. ह्या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ इ. गोष्टी केल्या जातात.  

त्या दिवशी आई, आजी-आजोबा हे तुम्हाला कडुलिंबाची पानं खायला लावतात. त्या मागचं शास्त्रीय कारण असं की ह्या कडुलिंबाच्या सेवनाने आपली पचनक्रिया सुधारते. वर करणी कडु असणारी ही वनस्पती आरोग्यदायक, आरोग्यवर्धक आणि आरोग्यदायी आहे. पचनक्रिया सुधारणे, पित्त नाश करणे, त्वचा रोग बरे करणे, धान्यांतली कीड थांबवणे हे आणि असे अनेक औषधीगुण ह्या कडुलिंबाच्या अंगी आहेत. दारी उभारलेली गुढी हे मांगल्याचं, पवित्र्याचं, समृद्धीचं प्रतिक आहे. ह्या दिवशी आनंद साजरा करीत आप्तेष्टांना नव वर्षाचे अ्भिष्टचिंतन ही केले जाते. ह्या गुढी पाडव्यापासूनच श्रीराम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाचा सुद्धा प्रारंभ होतो.